नवी दिल्ली- दिल्ली दारू धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ जुलैपर्यंत वाढ केली. आज त्यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीस हजर झाले. त्यावेळी न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत वाढ केली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांचा नियमित जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने दोनदा फेटाळला आहे आणि तिसऱ्यांदा सिसोदिया यांची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. के.कविता यांना ईडीकडून १५ मार्च रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत.