सुनेत्रा पवारांचाही प्रचार कण्हेरी मंदिरातूनच सुरू

बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमधील आपले मूळ गाव काटेवाडी येथील कण्हेरी मंदिरात महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील काल कण्हेरी मंदिरातूनच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. पवार कुटुंबातील कुठलाही सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला की, त्याच्या प्रचाराचा शुभारंभ कण्हेरी मंदिरातूनच होतो. दरम्यान, आज प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि अजित पवारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेवेळी अजित पवारांनी सांगितले की, ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. इतर पक्षांमध्ये पाहिले तर देशाचा विकास करेल असा मोदींच्या तोडीचा नेता दिसत नाही. त्यामुळे ही निवडणूक मुलगी विरुद्ध सून, नणंद विरुद्ध भावजय अशी नसून राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. काल देशभरातील पत्रकार बारामतीमध्ये आले होते. तेव्हा मी पाहिले की, शरद पवार हे व्यासपीठावर बसले होते. संपूर्ण कुटुंब त्यांच्या पायाशी बसले होते. याआधी अस कधीच घडले नव्हते. मात्र आता लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ सुनेत्रा पवारांनी सभेत सांगितले की, नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत आहे. तुम्ही सगळेच अजित पवारांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात. मात्र त्यांच्यामुळे मलाही पाठिंबा देणार याची खात्री आहे. आपले सहकारी विजय शिवतारे आणि बाकी सहकाऱ्यांच्या सोबत येण्याने वज्रमुठ पक्की झाली आहे. हे सगळे सहकारी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top