सुरत – गुजरातच्या सुरत शहरात पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळी ६ ते १० या केवळ चार तासात पडलेल्या १० इंच पावसाने शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. शहर व आसपासच्या तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले .सुरतमधील अनेक नद्यानाल्यांना पूर आले असून उमरपाडा तालुक्यातील वीरा व महुबन नद्यांना आलेल्या पूरामुळे पिनपूर ते देवघाट हा मार्ग बंद झाला आहे. उमरपाडा तालुक्यातील महुवन नदीवरील पुलावर पाणी आले होते. या पाण्यात एक कार वाहून गेल्याचे वृत्त आहे. उमरपाडा येथील आमली बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्य़ात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीकिनाऱ्यावर २७ गावे असून त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला सज्ज करण्यात आले. सुरत शहरातही जागोजागी वाहतूक कोंडी झाली. शहराच्या सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.