मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) काल देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेवर कारवाई करत या तिन्ही बँकांना दंड ठोठावला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिन्ही बँकांवर ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले.
स्टेट बँकेवर ठेवीदार शिक्षण जागरूकता निधी योजना, २०१४ शी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बँकेला आरबीआयने २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत आरबीआयने सांगितले की, स्टेट बँकेला हा दंड ठेवीदार एज्युकेशन अवेअरनेस फंड आणि कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या कंपनीमधील शेअरहोल्डिंगशी संबंधित उल्लंघनामुळे आकारण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने काही कंपन्यांच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या ३० टक्के पेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले आहेत. त्यामुळे अनेक बँकांवर ही कारवाई करण्यात येत आहे.
आरबीआयने सिटी युनियन बँकेला कर्ज खात्यांसंबंधी उत्पन्न निश्चिती, मालमत्ता वर्गीकरणविषयक नियमांचे उल्लंघन आणि बुडीत कर्ज खात्यांमधील विसंगती आढळल्याप्रकरणी ६६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की, ‘कॅनरा बँकेने ३१ मार्च २०२१ पर्यंत खात्यांशी संबंधित नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.’ कॅनरा बँकेला काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ३२.३० लाख रुपयांचा दंड ठोठाण्यात आला. आरबीआयने सांगितले की, ओडिशातील राउरकेला येथे असलेल्या ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवर १६ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या कंपनीवर एनबीएफसी संबंधित नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता.यासंबंधितच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींनंतर हा दंड ठोठावण्यात आला. नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित दंड ठोठावण्यात आला आहे आणि संबंधित बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर यातून कोणतीही साशंकता व्यक्त करण्याचा या कारवाईमागे हेतू नाही.