नवी दिल्ली- हरयाणातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी १३ फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाचे सरकार सतर्क झाले असून अनेक ठिकाणी संचारबंदी जारी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.
पिकांसाठी किमान आधारभूत किमतीच्या हमीसाठी कायदा लागू करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी मजदूर मोर्चासारख्या शेतकरी संघटनांनी हा मोर्चा आयोजित केला आहे.
या मोर्चाच्या धास्तीने हरियाणा सरकारने अनेक जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट, बल्क एसएमएस आणि डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत खंडित करण्याची घोषणा केली आहे. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद असेल. हा आदेश ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील. शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे अंबाला, जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये पंजाब आणि हरियाणामधील सीमा सुरक्षित करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अंबालामध्ये हरियाणा पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून क्रेन आणि कंटेनर उभे करून अडथळे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल प्रतिक्रिया देताना म्हणाले की, एका बाजूला सरकार आम्हाला चर्चेसाठी बोलावते आणि दुसरीकडे आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करते. संचारबंदी लागू करणे, इंटरनेट बंद करणे अशा वातावरणात विधायक चर्चा होऊ शकत नाही. सरकारने आमच्या प्रश्नांकडे तत्काळ लक्ष द्यायला हवे.