हिंसाचाराच्या ४ प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना जामीन मंजूर

लाहोर – लाहोरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या चार प्रकरणांत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे इम्रान खान यांना दिलासा मिळाला. हिंसाचाराच्या आणखी आठ प्रकरणांची सुनावणी न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यांच्याविरोधात तोशाखाना प्रकरणासह अनेक खटले सुरू आहे. सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहे.लाहोरमध्ये ९ मे २०२३ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात १२ प्रकरणांमध्ये इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर सरकारी आणि लष्करी इमारतींवर हल्ला करुन हिंसाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता त्यांना मॉडेल टाऊन भागात पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझचे (पीएमएल-एन) कार्यालय जाळणे, कलमा चौकाजवळ कंटेनर, गुलबर्ग येथील पोलीस वाहने आणि शेरपाव पुलावरील हिंसाचार या चार गुन्ह्यांप्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला.