हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी! रस्ते वाहतुक बंद

तमिळनाडूतही पावसाचा इशारा

नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात काल आणि आज जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर ३ हून अधिक रस्ते आणि ५४ पॉवर ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत. एनएच ३ सोलंगनाळा ते अटल बोगदा आणि एनएच ३०५ जालोरी जोत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीनंतर कुपवाडा ते तंगधार केरन रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूच्या समुद्रकिनारी १ ते ४ डिसेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट वाढली आहे. कमाल तापमानात ४ अंश सेल्सिअसपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली आहे. अनेक शहरांतील किमान तापमानही ५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. शिमल्याच्या नारकंडा येथील हातू माता मंदिर आणि चंशालमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. पुढील २४ तासांत शिमला, कुल्लू, किन्नौर, मंडी, चंबा, लाहौल स्पिती, कांगडा आणि सिरमौरच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपर्यंत राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये २८ नोव्हेंबरपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे चेन्नईतील अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top