हिरानंदानी बिल्डरवर ईडीची छापेमारी! देशभरातील 24 कार्यालयांत तपास

मुंबई- प्रसिद्ध बिल्डर हिरानंदानी यांच्या देशभरातील 24 कार्यालयांवर ईडीने आज सकाळीच छापे टाकले. मुंबई, मुंबईजवळील पनवेल, चेन्नई व बंगळूरसह ठाणे, दिल्ली, बाडमेर, नोएडा, पाटणा, जयपूर, गुरूग्राम, बागपत, चंदीगड, जोधपूर आदी ठिकाणच्या हिरानंदानी कार्यालयांत तपास करण्यात आला. अदानी समूहाच्या विरोधात संसदेत सतत सवाल करणाऱ्या तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानीने मदत केल्याच्या ताज्या प्रकरणामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
यापूर्वीही हिरानंदानी बिल्डरवर धाडी पडल्या आहेत. तरीही प्रत्येक शासकीय समारंभात मोठा उद्योजक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
यापूर्वी मार्च 2022 मध्येही आयकर चुकवेगिरीच्या आरोपाखाली आयकर विभागाने हिरानंदानींच्या मुंबई, चेन्नई व बंगळूरसह 24 कार्यालयांवर छापे टाकले होते. समूहाचे संचालक, मुख्य वित्त अधिकाऱ्यांचे कार्यालय, विक्री स्थळे व निवासी ठिकाणांवर त्यावेळी कारवाई करण्यात आली होती. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी हिरानंदानी समूहाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे ई-रेकॉर्ड व सेल्स रेकॉर्ड आदींची छाननी केली होती.
निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र दर्शन हिरानंदानी आणि तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. मोईत्रा यांना अदानी यांच्या विरोधात आपल्या वतीने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी दर्शन यांनी पैसे व महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे मोईत्रा यांनी खासदारकी गमावली होती. त्यापूर्वी पँडोरी कागदपत्रांत निरंजन हिरानंदानी यांचे नाव एका ट्रस्ट प्रकरणी आले होते. 1978 साली स्थापन झालेल्या हिरानंदानी समूहाचे मुख्यालय मुंबईत असून, भारतातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये या समूहाची गणना होते. या समूहाचे मुंबई, बंगळुरू, चेन्नई व हैदराबाद या ठिकाणी मोठे बांधकाम प्रकल्प
चालू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top