१८ जानेवारीपासून पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पुणे- पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणाही त्यांनी केली.
या महोत्सवात यावर्षी ५१ देशांमधून आलेले १४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता,चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी मान्यवर व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.आगामी चित्रपट महोत्सवाचे सूत्र ‘चित्रपट एक आशा’ म्हणजेच ‘सिनेमा इज अ होप’ हे असून त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या चित्राची माहिती यावेळी देण्यात आली./या महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी अशा एकूण ११ स्क्रीनवर दाखविले जाणार आहेत.
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक २ स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ.पटेल यांनी सांगितले. महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २३ डिसेंबरपासून महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असून, चित्रपटगृहांवर जागेवर नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावर्षी ६८ देशांतून ११८६ चित्रपट महोत्सवासाठी दाखल झाल्याचे आणि त्यापैकी १४०हून अधिक चित्रपटांची महोत्सवासाठी निवड झाल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागातील १४ चित्रपटांमध्ये अ सेन्सेटिव्ह पर्सन, ब्लागाज लेसन्स, सिटिझन सेंट,बफ्लाय ऑन, हिअर, ओशन आर द रिअल कॉन्टिनेंटस्, पुआन, शल्मासेल, टेरिस्टेरीयल व्हर्सेस, द बर्डन्ड, द ड्रीमर, द सेन्टेन्स, टोल, टुमारो इज अ लॉंग टाईम यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top