२० हजार विद्यार्थ्यांनी मतदारांच्या जनजागृतीसाठी संकल्प पत्रे लिहिली

इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे शाळेत जमा केली आहेत.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहरातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्यामध्ये शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या हस्ताक्षरात पत्रे लिहिण्यास आणि त्या पत्रांवर पालकांनी स्वाक्षरी करण्यास सुचवले होते. त्यानुसार आपल्या मुलांनी मतदार जनजागृतीसाठी लिहिलेली २० हजार पत्रे शाळेत जमा केली आहेत.

या उपक्रमामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पालिका क्षेत्रातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार आहे. दरम्यान,लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे, असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.