सातारा- राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध असलेला आणि ३५० वर्षांची परंपरा लाभलेला वाई तालुक्यातील ओझर्डे गावचा सोंगांचा महोत्सव नुकताच पार पडला. होळीनंतर रंगपंचमी दिवशी हा सोंगांचा पारंपरिक खेळ खेळला जातो.
यंदाही ओझर्डे गावातील रंगारी आळी आणि माळी आळी या दोन्ही आळींतील तरुणांनी एकत्र येऊन सोंगे काढली होती. हा सोंगांचा खेळ रात्रभर चालला होता. सोंगांना धार्मिक आणि इतिहासाची किनार दिली जाते.या सोंगांतील महिलांचे पात्र हे पुरूषच साकारतात. हे पात्र हुबेहुब महिलांसारखे दिसते.३५० वर्षांपासुन चालत आलेली ही सोंगे काढण्याची परंपरा नवीन पिढीने कायम ठेवली आहे. ही सोंगे पाहण्यासाठी यंदा लोकांनी मोठी गर्दी केली होती.