३५ वर्षीय डॅनियल नोबोआ बनले इक्वेडोरचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष

क्वीटो: उजव्या विचारसरणीचे उमेदवार डॅनियल नोबोआ (वय ३५) यांची इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रविवारी रात्री नॅशनल इलेक्टोरल कौन्सिल ऑफ इक्वाडोर (सीएनई) च्या अध्यक्षा डायना अटामेंटने नोबोआ यांना इक्वेडोरचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषित केले. नोबोआ यांना ५२.३ टक्के मते मिळाली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी डाव्या पक्षाच्या उमेदवार लुईसा गोन्झालेझ यांना ४७.७ टक्के मते मिळाली असल्याचे सीएनई ने सांगितले.

२०२१ ते २०२३ दरम्यान नोबोआ इक्वाडोरच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते. त्यानंतर आता नोबोआ हे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवलेले इक्वेडोरचे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ते २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतील. डॅनियल नोबोआ पुढील निवडणुकीपर्यंत केवळ १७ महिने पदावर राहतील. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर लुईसा यांनी नोबोआ यांचे अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना नोबोआ यांनी त्यांना देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांची पत्नी, आई-वडील आणि देवाचे आभार मानले. या नवीन इक्वेडोरसाठी काम करण्यास मी तयार असून, या देशाला हिंसाचार, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढून देशाच्या पुनर्बांधणीसाठी काम सुरू करू, अशी ग्वाही नोबोआ यांनी समर्थकांशी बोलताना दिली.

लॅटिन अमेरिकन राष्ट्र असलेले इक्वेडोर गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार, वाढती गुन्हेगारी यामुळे त्रस्त आहे. या परिस्थितीत इक्वेडोरमधील मतदारांनी तरुण आणि उद्योजक असलेल्या डॅनियल नोबोआ यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. डॅनियल नोबोआ हे केळी उद्योगातील व्यापारी म्हणूनही ओळखले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top