बीड – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसंबंधी काल आपली भूमिका जाहीर केली. राज्यातील निवडक मतदारसंघात आपण उमेदवार जाहीर करत असल्याचं त्यांनी सांगितले. जो उमेदवार आम्हाला 500 रुपयांच्या बाँडवर मराठा आरक्षणासंदर्भात लिहून देईल, त्यांना पाठिंबा देण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज अंतरवाली सराटीत 500 रुपयांच्या बाँड पेपर घेऊन उमेदवार पोहोचत आहेत.
या उमेदवारांना जरांगे यांनी असे आव्हान केले की, तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय होते आहे की, कुणीही ५०० रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे येतो आहे. त्यामध्ये, एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन 500 रुपयांचा बाँड घेऊन लिहून देतो आहे. मराठ्यांचे मतदान आहे, म्हणून तुम्ही उगाच बाँड लिहित बसायचे, असे करु नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा, किंवा येऊन भेटा. जिथे आम्ही उमेदवार देणार नाहीत, तिथे कुठल्या पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्याचे मेरीट आम्ही तपासणार आहोत. समजा एखाद्याने आम्हाला बाँडवर लिहून दिले नाही तर त्या मतदारसंघातील अपक्ष किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू. केवळ मराठ्यांचे मतदान मिळत आहे म्हणून बाँडवर लिहून देतोय, हे चालणार नाही. आमच्याकडे डायरेक्ट बाँडवर लिहून आणून देऊ नका.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक आणि शिवसेना उबाठाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. जालन्यातील बदनापूर मतदारसंघ एससी जागेसाठी आरक्षित असून काल मनोज जरांगे यांनी आरक्षित जागेवर उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर संतोष सांबरे यांनी भेट घेऊन जरांगेंचे आभार मानले आहेत.