नवी दिल्ली – भारत-चिन सीमेवरील तणाव निवळल्यानंतर पाच वर्षांपासून खंडित झालेली कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहे. ब्राझीलच्या रिओ डी जानेरोमध्ये जी-२० राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चिनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्या भेटीत यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली,अशी माहिती सूत्रांनी दिली.भारत-चिन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत पूर्व लडाखमधील देपसँग आणि डेमचोकमधून दोन्ही देशांच्या फौजा शांतता करारांतर्गत मागे घेण्यात आल्यानंतर उभय देशांमध्ये झालेली ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होती. या बैठकीत कैलास मानसरोवर यात्रा,तसेच भारत-चिन दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली.कैलास मानसरोवर यात्रेचे दोन अधिकृत मार्ग पाच वर्षांपासून बंद आहेत. नेपाळमधून जाणारा खासगी मार्ग गेल्या वर्षी खुला झाला आहे. मात्र त्या मार्गाचा वापर करण्याची परवानगी भारतीय नागरिकांना नाही. त्यामुळे दोन अधिकृत मार्ग खुले केल्यास यात्रा पुन्हा सुरू होऊ शकेल. कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आलेली थेट विमानसेवा लॉकडाऊन उठविल्यानंतरही पुन्हा सुरू झालेली नाही. तीदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.
