अंबाबाई मंदिर परिसरातील पुनर्विकास आराखड्याला गती

कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती मिळाली आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसांमध्ये सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात पुनर्विकास आराखडा राज्य सरकारसमोर सादर केला जाईल, याद़ृष्टीने प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात सध्या परिसरातील रहिवासी, दुकानदार, व्यापारी यांच्याशी चर्चा करून देवस्थान समिती प्रशासनाकडून त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले की, सल्लागार नियुक्ती झाली की, त्यांच्याकडून महिन्याभरात आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. हा आराखडा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, परिसरातील रहिवासी, व्यापारी यांच्यापुढेही सादर केला जाईल. यानंतरच तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारसमोर सादर केला जाणार आहे.

अंबाबाई मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी ही संख्या वाढत असते. याच पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणार्‍या सेवासुविधा आणि सुरक्षितता, याकरिता अंबाबाई मंदिर परिसरात कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. या कॉरिडोरसाठी मंदिर परिसराचा पुनर्विकास करण्याच्या द़ृष्टीने प्रक्रिया सुरु झाली आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मंदिराभोवतालचा सर्व परिसर खुला करून त्याचा योग्यप्रकारे विकास केला जाणार आहे. यामध्ये अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूला, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिर रस्ता, असा सुमारे साडेतीन एकरच्या परिसराचा विकास होणार आहे. परिसरात मोकळी जागा, त्यात दर्शन मंडप, स्वच्छतागृहे, महिला भाविकांसाठी विशेष बैठक व्यवस्था, व्यापारी संकुल, माहिती केंद्र, कार्यालय, सुशोभीकरण आदी कामे पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top