अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या काश्मिरी अक्रोड विक्रेत्याला अटक

मुंबई – अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या काश्मीरी आक्रोड विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत सुमारे 1.04 कोटी किमतीचे 2.600 किलो काश्मिरी चरस जप्त केले. यासोबत इतर कारवाईत 22 लाख रुपये रोख आणि एक दुचाकीसह 120 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. असा एकूण 1.51 कोटी ड्रग्ज हस्तगत करून विशेष ऑपरेशनमध्ये एका काश्मिरी अक्रोड व्यापारी व्यक्तीसह ६ जणांना अटक केल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली.
अंमली पदार्थ तस्करांनी जम्मू काश्मीरमधून काश्मिरी चरस आणले होते. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग इथे राहणाऱ्या काश्मिरी आरोपीचे नाव हाजी अब्दुल रेहमान आहे. हाजी अब्दुल रेहमानसह सरताज अहमद मुमताज मन्सुरी आणि कैलास दीपक कनोजिया या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या असून ही दोघे पूर्वी उत्तर प्रदेशात राहत होते. कनोजिया याचे मुंबईत टेलरिंगचे दुकान असून अक्रोड विक्रीच्या नावाखाली ही आंतरराज्यीय टोळी अमली पदार्थ विकत होते.
याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला माहिती मिळाली. युनिटला 21 डिसेंबरला विशेष ऑपरेशनमध्ये भायखळा पूर्व भागात गस्त घालताना 1.800 किलो काश्मिरी चरससह दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी करताना त्यांचा आणखी एक साथीदार भायखळा पूर्व भागात असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर भायखळा पूर्व परिसरातून तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्याच्याकडून 800 ग्रॅम काश्मिरी चरस जप्त करण्यात आला.
यासोबत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटला 21 डिसेंबरला माहीम परिसरात विशेष ऑपरेशनमध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आली. त्याच्या अंगझडतीत एमडी ड्रग्ज आढळून आले होते. या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने मुंबई परिसरातून एमडी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर दोन आरोपींना शोधून काढून एकाच्या घरातून 22 लाखांची रोकड जप्त केली. या तिन्ही आरोपींकडून एकूण 120 ग्रॅम एमडीसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top