सोलापूर – माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटीला कुंभारी टोलनाक्याजवळ अचानक आग लागली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि ४५ ते ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.परंतु या आगीत संपूर्ण जळून खाक झाली. ही दुर्घटना काल सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ही एसटी कुंभारी टोलनाक्याजवळ पोहचली असताना अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. यावेळी बसमध्ये ४५ ते ५० प्रवासी प्रवास करीत होते.चालकाने माहिती देता सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले.पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्र रूप धारण केले.अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत ही बस आगीत पूर्णतः जळून खाक झाली होती.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








