‘अटल सेतू’वरील टोलचे दरसामान्यांना परवडणारे नाहीत

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन झाल्यावर त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र या पुलावरून प्रवास करण्यासाठी लागू करण्यात आलेले टोलचे दर पाहून वाहनचालकांचे डोळे चक्रावत आहेत. विशेष करून, महिन्याच्या टोल पासाचे दर वाहनानुसार कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 80 हजार इतके आहेत. त्यामुळे अटल सेतूवरील इतका महागडा प्रवास वाहनचालकांना कसा परवडणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे.
21 किलोमीटर अंतराचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी पूल ठरला आहे. 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलामुळे वाहनांचा अर्ध्या तासाचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. मात्र, त्यासाठी वाहनचालकांना टोलची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अटल सेतूवरून मोटारीने प्रवास केल्यास एक वेळच्या प्रवासाचा 250 रुपये टोल भरावा लागत आहे. परतीचा प्रवास केल्यास दोन्ही टोलसाठी 375 रुपये मोजावे लागत आहेत. 625 रुपयांत दैनंदिन पास मिळत आहे, तर मासिक पास 12,500 रुपयांचा आहे. मिनी बससाठी एका बाजूचा टोल 400 रुपये, परतीचा प्रवासासाठी 600 रुपये, दैनिक पास 1,000 रुपये, तर मासिक पास 20,000 रुपये आहे.
बस किंवा दुहेरी एक्सलच्या ट्रकसाठी एका मार्गाचा टोल 830 रुपये, परतीच्या प्रवासाचा टोल 245 रुपये, दैनंदिन पास 2,075 रुपये आणि मासिक पास 41,500 रुपये आहे. थ्री एक्सल ट्रकसाठी, सिंगल टोल 905 रुपये, परतीचा प्रवासाचा टोल 1,360 रुपये, तर दैनंदिन पास 2,265 रुपये, तर मासिक पास 45,250 रुपये आहे. 4 ते 6 एक्सलच्या वाहनांसाठी सिंगल ट्रॅव्हल टोल 1,300 रुपये आणि परतीच्या प्रवासाचा टोल 1,950 रुपये, दैनंदिन पास 3,250 रुपये असून मासिक पास 65,000 रुपये आहे. याशिवाय मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी एकेरी प्रवास टोल 1,550 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 2,370 रुपये, दैनंदिन पास 3,950 रुपये, तर मासिक पास तब्बल 79,000 रुपये आहे.
वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, अटल सेतूमुळे वाहनांचे जास्तीत जास्त 15 किलोमीटर अंतर वाचणार आहे. एवढ्या अंतरासाठी इतका टोल देणे परवडण्यासारखे नाही. तो आणखी कमी असायला हवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top