अदानींवर नवे गंभीर आरोप! वीज बिल वाढवून लुटले

नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानींच्या कंपन्यांबाबत सतत सवाल उठवत पंतप्रधान मोदींना अडचणीत आणणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अदानींचा नवा घोटाळा उघड केला. गरीबाने फॅन लावला की अदानींच्या खिशात बेकायदा पैसा जातो असे सांगत कोळसा आणि वीज घोटाळा करून अदानींनी जनतेचे 12 हजार कोटी लुटल्याचा नवा आरोप राहुल गांधी यांनी केला. याची चौकशी होणार का? याचे उत्तर आता पंतप्रधान मोदींनी द्यायचे आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. अदानींनी आता थेट देशातल्या गरीबांनाच लक्ष्य केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. फायनान्शिअल टाइम्स, लंडन या वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अदानी विजेसाठी इंडोनेशियातून कोळसा घेतात. हा कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते आणि या वाढीव बिलाचा भुर्दंड सामान्य वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. देशातील नागरिकांनी विजेचे स्विच ऑन करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये वीज बिलात सवलत दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये वीज बिलात सवलत देणार आहोत. पण अदानींची वीज बिले मात्र फुगवून दिली जातात. आधी अदानींच्या 20 हजार कोटींच्या घोटाळ्याबद्दल आम्ही बोलत होतो. आता त्यात विजेचे 12 हजार कोटी रुपये आणखी वाढले आहेत. 32 हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानींच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही कारण अदानींना पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्याची आवश्यकता भासत नाही.
फायनान्शिअल टाइम्समध्ये या विषयावर 12 ऑक्टोबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘द मिस्टरी ऑफ द अदानी कोल इम्पोर्ट्स दॅड क्वाइटली डबल्ड इन व्हॅल्यू’ असे या वृत्ताचे शिर्षक आगे. फायनान्शियल टाइम्सने अनेक कस्टम रेकॉर्ड्स तपासले. भारताच्या अर्थव्यवस्थेतील मोठा भागावर अदानींचा प्रभाव आहे. अदानींनी बाजारभावापेक्षा खूप जास्थ किमतीने अब्जावधी डॉलर्सचा कोळसा अदानींनी आयात केला. गेल्या दोन वर्षांत अदानींनी तैवान, दुबई आणि सिंगापूर मध्ये परदेशी मध्यस्थांकरवी पाच अब्ज डॉलर इतक्या किमतीचा कोळसा आयात केला. ही किंमत अनेकदा बाजारमूल्यापेक्षा दुपटीहून अधिक होती. 2019 ते 2021 या कालावधीत अदानीच्या एका कंपनीद्वारे इंडोनेशियातून मागवलेल्या कोळशाचा अभ्यास केल्यानंतर आकडेवारी दिल्याचे फायनान्शिअल टाइम्सने म्हटले आहे. या आरोपांसंदर्भातील गौतम अदानींची प्रतिक्रिया देखील या वृत्तपत्रात दिली आहे. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
शरद पवार पंतप्रधान नाहीत…
ही पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराने शरद पवार आणि गौतम अदानींच्या भेटीबद्दल राहुल गांधींना विचारले, तेव्हा ते म्हणाले की, शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top