Home / News / अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

मुंबई – मराठी अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचे निधन काल वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात पोकळी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मराठी अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचे निधन काल वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. मीरारोड येथील एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार पडले.

२०२२ मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोकने ग्रासले होते. ज्यामुळे त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या उपचारासाठी लागणारा खर्च वाढत गेल्याने त्यांची आर्थिक स्थितीही खालावली होती. त्यावेळी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत इंडस्ट्रीतील कलाकार, संस्थांना आणि चाहत्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. यापाठोपाठ, त्यांच्यात उपचारांमूळे सुधारणा झाली आणि ते आजारातून पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर त्यांनी कुलस्वामिनी,२६ नोव्हेंबर या मराठी चित्रपटांद्वारे अभिनय क्षेत्रात पुन्हा कमबॅक केला. २६ नोव्हेंबर हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांचे निधन सर्वांनाच धक्का देणारे आहे.

डॉ. उजवणे यांचा जन्म १६ डिसेंबर १९६४ ला नागपूरमध्ये झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्येच झाले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध नाटक, एकांकिकांमधून भूमिका केल्या होत्या. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांची वादळवाट या मालिकेतील भूमिका विशेष गाजली. याशिवाय चार दिवस सासूचे आणि दामिनी मालिकेतही त्यांनी केलेल्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांनी एकूण ११० चित्रपट, १४० मालिका आणि तब्बल ६७ नाटकांचे ३००० हून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काही भूमिका साकारल्या होत्या. शुभम भवतू हा त्यांचा डायलॅाग विशेष लोकप्रिय झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या