अभिनेते शरद पोंक्षेची अखेर माघार! नव्या नावासह नाटक सादर करणार

मुंबई- ‘ मी नथुराम गोडसे बोलतोय ‘ या नाटकाचे निर्माते व माऊली प्रॉडक्शनचे मालक उदय धुरत यांनी अभिनेता शरद पोंक्षेविरोधात न्यायालयात धाव घेतली.पोंक्षे यांनी आपल्या मूळ नाटकाची नक्कल करून नवे नाटक आणल्याचा दावा केला आहे. मात्र आता शरद पोंक्षे यांनी न्यायालयात माघार घेतली असून आपल्या नव्या नाटकाच्या नावात बदल करणार असल्याचे न्यायालयात सांगितले. ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे ‘असा बदल पोंक्षे करणार आहेत. उच्च न्यायालयाने याबाबतची सुनावणी आता २७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.
या नाटकाच्या वादावरील खटल्याची सुनावणी काल न्यायमूर्ती रियाझ छगला यांच्यासमोर पार पडली. यावेळी उदय धुरत यांच्यातर्फे अ‍ॅड.हिरेन कमोद व अ‍ॅड.महेश म्हाडगुत यांनी तर शरद पोंक्षे यांच्यावतीने रशमीन खांडेकर यांनी बाजू मांडली.यावेळी उदय धुरत यांच्या वकिलांनी पोंक्षे यांच्या नव्या नाटकामुळे ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला.तर यावर पोंक्षे यांच्या वकिलांनी हा दावा खोटा असल्याचा युक्तिवाद केला.पोंक्षे यांनी माऊली भगवती प्रॉडक्शनतर्फे नवीन नाटक आणले आहे.यावेळी न्यायालयात पोंक्षे यांनी आपण आपल्या नाटकाच्या नावात बदल करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला. यावर न्यायालयाने त्यांना वेळ देत सेन्सॉर बोर्डालाही त्यांच्या अर्जावर विचार करण्याचे निर्देश दिले.आता पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला होणार असून कॉपीराईटच्या मुद्यावर यावेळी सुनावणी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top