अभिषेक घोसाळकर हत्या कटाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध का घेत नाही?

*उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

मुंबई- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध का घेतला जात नाही? तसेच अभिषेक यांच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांची दखल का घेतली जात नाही? असे संतप्त सवाल करत उच्च न्यायालयाने या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अभिषेक यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने पोलीस यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घ्यावी आणि पोलीस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली त्याचा तपास करून दोन आठवड्यांत तपासाचा प्रगत अहवाल सादर करावा, असे आदेशच खंडपीठाने पोलीस तपास यंत्रणेला दिले.

दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांच्यावतीने अ‍ॅड. वैभव महाडिक यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की,या प्रकरणात तपास यंत्रणेचा तपास योग्य दिशेने चाललेला नाही. या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार आजही मोकाट आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरलेली नाहीत. असे असतानाही घाईघाईत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top