Home / News / अमित ठाकरेंना पाठिंबा ही भाजपाची स्पष्ट भूमिका ! फडणवीसांचे वक्तव्य

अमित ठाकरेंना पाठिंबा ही भाजपाची स्पष्ट भूमिका ! फडणवीसांचे वक्तव्य

मुंबई – माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भाजपाची स्पष्ट भूमिका असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचीही माहीममध्ये उमेदवार देऊ नये यासाठी मान्यता होती. पण त्यांना काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाचे असे मत पडले की, तिथली मते उद्धव ठाकरेंकडे जातील. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार उभा केला आहे. पण आमची आधीपासून भूमिका होती की, राज ठाकरेंनी या एका जागेवर पाठिंबा मागितला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. आमचे कालही हेच मत होते आणि आजही हेच मत आहे. सदा सरवणकरांबाबत आम्ही बसून बोलू, तेव्हा ठरवू.
अजित पवारांच्या कालच्या तासगाव सभेतील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की,आर. आर. पाटील हयात नाहीत. त्यांच्याबद्दल काही बोलणे योग्य नाही. पण सिंचन घोटाळ्याची जी चौकशी सुरु झाली ती काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात झाली. मी त्या प्रकरणात जाणार नाही, परंतु अजित पवार यांच्याविरोधात जी चौकशी झाली त्याची माहिती घ्या.
पुढे ते म्हणाले की,सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बंडखोर परत आपल्या बाजूला कसे आणता येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. तसेच महायुती मध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.