अमित शहांना बाळासाहेबांनी मदत केली! त्यांचाच पक्ष फोडला

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‌‘नरकातला स्वर्ग‌’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना जामीन मिळवण्यास मदत केली. तर गुजरात दंगलींनंतर भाजपाने मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याची तयारी चालविली होती तेव्हा बाळासाहेबांच्या पाठिंब्यामुळे मोदींचे मुख्यमंत्रिपद वाचले, असे खळबळजनक दावे या पुस्तकातून राऊत यांनी केले आहेत. अडचणीच्या काळात ज्यांना बाळासाहेबांनी मदत केली त्याच मोदी-शहांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडून उपकाराची फेड अपकाराने केली, अशी खरमरीत टिप्पणीही राऊत यांनी पुस्तकातून केली आहे.
राऊत यांच्या या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन उद्या होणार आहे. मात्र त्याआधीच आज पुस्तकातील तपशील झळकला. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांसमोर म्हटले की, शंभर दिवसांच्या तुरुंगवासात आपल्याला आठवलेल्या भूतकाळातील काही घडामोडींची खरीखुरी माहिती आणि तीदेखील संदर्भासहीत आपण ‌‘नरकातला स्वर्ग‌’मध्ये मांडली आहे. 30-35 वर्षे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात राहिलो. या काळात मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिले, कानांनी जे ऐकले तेच जशास तसे पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेव्हा कोणाला फारसे माहीत नव्हते. ते खुनाच्या एका प्रकरणात अडकले होते. या प्रकरणातून केवळ बाळासाहेब ठाकरे हेच सहिसलामत बाहेर काढू शकतील असे त्यांना कोणीतरी सांगितले होते. त्यामुळे अमित शहा हे त्यांचा पुत्र छोट्या जयला (जय शहा) घेऊन तडक मातोश्रीवर दाखल झाले होते. तेव्हा मातोश्रीवरील सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. त्यावेळी गुजरातमधील आमदार असलेल्या शहांना कोणी ओळखले नाही. त्या दिवशी त्यांना बाळासाहेबांची भेट मिळाली नाही. ते मातोश्रीवरून बाळासाहेबांना न भेटताच निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मातोश्रीवर आले. तेव्हा प्रवेशद्वारावरून बाळासाहेबांना निरोप गेला की, गुजरातचा एक आमदार भेट घेण्यासाठी आला आहे. बाळासाहेबांनी शहांना भेटीसाठी बोलावले. भेटीत शहांनी त्यांची समस्या सांगितली आणि आपल्याला या प्रकरणातून वाचवण्याची विनंती बाळासाहेबांना केली. सीबीआयच्या विशेष पथकाचा आपल्याला जामीन देण्यास तीव्र विरोध आहे, असेही शहा यांनी बाळासाहेबांना सांगितले. त्यावर बाळासाहेबांनी एका व्यक्तीला फोन केला. फोनवर ते त्या व्यक्तीशी बराच वेळ बोलले. त्याचा तपशील मी पुस्तकात दिला नाही. कारण मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांचा भक्त आहे. बाळासाहेबांचे त्या व्यक्तीशी जे संभाषण झाले त्यातील शेवटचे एक वाक्य मी पुस्तकात दिले आहे. ते वाक्य असे आहे की, बाळासाहेब समोरच्या व्यक्तीला म्हणाले की, तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. बाळासाहेबांच्या या संभाषणानंतर अमित शहा त्या प्रकरणातून सहीसलामत सुटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचा किस्सा सांगताना राऊत म्हणाले की, गुजरात दंगलींमुळे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची प्रतिमा प्रचंड डागाळली होती. त्यांच्या खुनशी प्रतिमेचा पक्षाला फटका बसू शकतो म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी मोदींना पदावरून दूर करण्याची तयारी चालविली होती. स्वतः लालकृष्ण अडवाणी महापौर बंगल्यावर आले होते. त्यांनी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचा पक्षाचा विचार बाळासाहेबांसमोर मांडला. तेव्हा बाळासाहेब मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले. मोदींना पदावरून दूर करू नका असे सांगताना बाळासाहेब अडवाणींना म्हणाले की, गोध्रा कांडामुळे हिंदुत्वाचे वादळ घोंघावत आहे. हे वादळ मोदींभोवती घोंघावत आहे. अशावेळी मोदींना पदावरून दूर केले तर तो हिंदुत्वाशी द्रोह ठरेल. बाळासाहेबांचे म्हणणे अडवाणींनी मानले म्हणून मोदींचे मुख्यमंत्रिपदही वाचले आणि राजकारणातही ते टिकून राहू शकले.
अमित शहांच्या प्रकरणात मोदींनी शरद पवार यांची कशी मदत घेतली होती याचा तपशीलही राऊत यांनी पुस्तकात दिला आहे. खुनाचा गुन्हा असलेल्या आणि तडीपार करण्यात आलेल्या अमित शहा यांना वाचविण्यासाठी नरेंद्र मोदी हे शरद पवारांना वारंवार फोन करत होते. त्यावेळी शरद पवारांनी मोदींना विचारले की, ज्या माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही मला वारंवार फोन करत आहात तो माणूस आहे तरी कोण? त्यावर मोदी यांनी बडे काम का आदमी है, असे पवार यांना सांगितले होते, असे राऊत यांनी सांगितले.
माध्यमांना राऊत यांनी दिलेल्या या माहितीमुळे भाजपा आणि मित्रपक्षांच्या गोटांत अस्वस्थता पसरली. भाजपाचे गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट आदी नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. केवळ सनसनाटी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी राऊत यांनी केलेले हे दावे पोकळ आणि काल्पनिक आहेत, असा सूर या नेत्यांनी लावला. त्यांच्या या आरोपांनाही राऊत यांनी काही वेळाने पुन्हा माध्यमांसमोर येऊन प्रत्युत्तर दिले. माझे दावे पोकळ आहेत म्हणणाऱ्यांनी शरद पवार यांना जाऊन भेटावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.