अमेरिकेची युध्दनौका निघाली इस्त्रायलच्या पाठीशी मोठी ताकद

जेरुसलेम – हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीमधून इस्त्रायलवर जमीन, हवा आणि समुद्रमार्गे हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध चिघळत आहे. हमासच्या हल्ल्याला इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, गाझापट्टीतील हमासचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई हल्ले केले. या युद्धात अमेरिकेने इस्त्रायलची बाजू घेत युद्धनौका इस्त्रायलच्या समुद्रकिनार्‍याच्या दिशेने रवाना केल्या आहेत. एफ-35, एफ-15 आणि एफ-16 या लढाऊ विमानांनाही सज्ज ठेवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायलला अतिरिक्त मदत पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे.
हमासने इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर हमासच्या बाजूने इराण आणि लेबनॉनही युद्धात उतरल्यावर इस्रायलने अमेरिकेकडे मदत मागितली होती. काल अमेरिकेचे संरक्षणविषयक सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अमेरिका इस्रायलकडून आलेल्या अतिरिक्त लष्करी मदतीसाठीच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले होते. आज अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या किनार्‍याच्या दिशेने रवाना झाल्या. त्यामुळे इस्रायली लष्कर, हवाई दलाकडून गाझा पट्टीत तुफान बॉम्बफेक केली जात असताना दुसरीकडे भूमध्य सागरातून अमेरिकेच्या युद्धनौका गाझा पट्टीवर हल्ला करण्याची शक्यता आहे. यासह अमेरिकेने एफ-35, एफ-15 आणि एफ-16 या लढाऊ विमानेही तयार ठेवली आहेत. व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हमासकडून इस्त्रायलवर करण्यात आलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्त्रायलला अतिरिक्त मदत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रध्यक्ष बायडेन व कमला हॅरिस यांना सुरक्षा अधिकार्‍यांनी इस्त्रायलमधील परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
इस्त्रायलने हमासशी लढण्यासाठी गाझा सीमेवर एक लाख सैनिक पाठवले आहेत. त्याचबरोबर इस्त्रायलच्या हवाई दलाने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे 500 तळ नष्ट केले आहेत. युद्धाच्या तिसर्‍या दिवशी आतापर्यंत 700 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. इस्त्रायलच्या प्रत्युत्तरात 500 हून पॅलेस्टिनी ठार झाल्याचे सांगितले जात असून, 2,000 हून अधिक जखमी झाले आहेत. तर इस्त्रायलमधून 163 लोकांचे अपहरण केल्याचा दावा हमासने केला आहे. यामध्ये सैनिक, महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हमासच्या हल्ल्यात अमेरिकेतील 4 नागरिकांसह, नेपाळमधील 10 विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. तर थायलंड परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्त्रायलमधील हल्ल्यात 12 थाई नागरिक ठार झालेत तर 8 जण जखमी झाले आहेत. तसेच आणखी 11 नागरिकांचे अपहरण झाले आहे.
तेल अवीवमधील भारतीय दूतावासानुसार, इस्रायलमध्ये 18,000 भारतीय राहतात. सध्या सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे. इस्त्रायलमध्ये गेलेल्या भारतीय पर्यटकांनी दूतावासाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.

युद्धामुळे सोने-चांदी-इंधन महागणार
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा परिणाम भारताच्या शेअर बाजार आणि कमेडिटी मार्केटमध्ये दिसला. आज निफ्टीमध्ये 130 अंकाची तर सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण पाहायला मिळाली. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरातही 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच पितृपक्ष असूनही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1.18 टक्के वाढ म्हणजेच 540 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर 57,540 रुपये प्रति ग्रॅम झालेत. युद्ध चालू राहिल्यास हे दर आणखी वाढतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top