अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे एकाच वेळी ३५ चक्रीवादळे

  • ४ जणांचा मृत्यू, १०० जखमी

वॉशिंग्टन

अमेरिकेतील आयोवा आणि ओक्लाहोमा या राज्यांमध्ये एकाच वेळी ३५ चक्रीवादळे आली. यामुळे आतापर्यंत एका अर्भकासह ४ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये फक्त सल्फर शहरातील ३० हून अधिक लोकांचा समावेश आहे. या चक्रीवादळात बहुतांश इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.

आयोवा आणि ओक्लाहोमामध्ये वादळामुळे ५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट म्हणाले की, संपूर्ण शहरात विध्वंस झाला आहे. लोकांच्या व्यवसायाचे नुकसान झाले. २० हजारांहून अधिक लोक विजेविना जगत आहेत.

याबाबत व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री शहरात वादळी वाऱ्यामुळे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे परिसरात पूर आला. त्याच्या धडकेमुळे अनेक गाड्या उलटल्या, घरांची छते उडून गेली आणि भिंतीही पडल्या. यानंतर लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन पथके पाठवण्यात आली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल ओक्लाहोमाच्या गव्हर्नरशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेतील १२ काऊन्टीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ओक्लाहोमा हवामान खात्याने काल २५० चक्रीवादळ आणि ४९४ तीव्र वादळांचा इशारा दिला होता. यापूर्वी १९७४ आणि २०११ साली ओक्लाहोमामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top