अमोल कोल्हेंना शिरूरमध्ये पाडणारच! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार

पुणे – ‘पाच वर्षात एका खासदाराने त्याच्या सहा मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले होते. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. काळजी करू नका, पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार. तिथे आमचाच उमेदवार निवडूनच आणणार’, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी आज जाहीर निर्धार केला आहे.
अजित पवार यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आले आहेत. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, “एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते, तर खूप बरे झाले असते. एक ते दीड वर्षापूर्वी त्या खासदाराने मला आणि आमच्या वरिष्ठांना राजीमाना देतो असे सांगितले होते. त्यांनी सांगितले की, मी राजीनामा देतो आहे, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर होता तरी तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होत आहे . मग त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचे रान केले.”
अजित पवार म्हणाले की, ” उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगले आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेने खिळवून ठेवण्याचे काम केले. मी हे कधीच बोलणार नव्हतो, पण आता यांना उत्साह आला आहे, निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पदयात्रा, कोणाला संघर्षयात्रा सुचत आहे. लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वांनाच पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण काळजी करू नका, शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार. तिथे आमचा उमेदवार निवडूनच आणणार.”
पवारांच्या या निर्धारावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी शिरूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. याचा निर्णय शरद पवार घेतील.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top