अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार! खा. हरभजन सिंग यांची भूमिका

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण स्वीकरण्यावरून विरोधी पक्षांनी वेगळी भूमिका घेतली असतानाच माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे खासदार हरभजन सिंग यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हरभजन सिंग यांनी सांगितले की, ‘कुणी काहीही ठरविले असले तरी मी राम मंदिराच्या सोहळ्यासाठी जाणार आहे.’

हरभजन सिंग यांनी सांगितले की,’प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोण जाणार आणि कोण जाणार नाही, हे महत्त्वाचे नाही. काँग्रेस किंवा इतर पक्ष जाणार आहेत की नाही, हे मला माहीत नाही. पण मी नक्कीच जाणार आहे. देवावर माझी श्रद्धा असल्यामुळे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. माझ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यामुळे कोणाला काही अडचण वाटत असेल तर त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. राम मंदिराचे निर्माण झाले आहे, तर आपण त्याठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले पाहिजे. मी तर नक्की प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. राम माझ्या आस्थेचा विषय आहे. आज जो मी कोणी आहे, जे नाव कमावले आहे, ही परमेश्वराचीच कृपा आहे. त्यामुळे मी अयोध्येत राम दर्शनाला जाणार आहे.’

इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहता दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पाठ करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याने या सोहळयाला जाणार नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर खासदार हरभजन सिंग यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top