अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू

लखनौ –

अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी साजरा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातील लाखो लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आखलेल्या योजनेनुसार श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि अयोध्या विकास प्राधिकरणातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी तंबू शहरे बांधली जात आहेत. यामध्ये भाविकांच्या राहण्याची व भोजनाची सोय केली जाणार आहे.

अयोध्या विकास प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी या तयारीबाबात सांगितले की, माढा गुप्तार घाट, बाग बिजेसी, कार सेवकपुरम, मणिराम दास कॅन्टोन्मेंट आणि ब्रह्मकुंड येथे ठिकाणी टेंट सिटी उभारण्याचे काम सुरू आहे. या सिटीत हजारो भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. माढा गुप्तार घाट येथील २० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये सुमारे २०,००० ते २५,००० भाविक राहू शकतात. अयोध्या धाममधील ब्रह्मकुंडजवळील टेंट सिटीत ३५ मोठे तंबू उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३०,००० भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बाग बिजेसीमध्ये २५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये सुमारे २५,००० भाविक राहतील. २२ जानेवारीला अभिषेक सोहळ्याच्या वेळी कडाक्याची थंडी असेल. त्यामुळे भाविकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, अशा पद्धतीने टेंट सिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी गाद्या आणि ब्लँकेटचीही व्यवस्था करण्यात येत आहे. इथे राहणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांसोबतच अन्नसाठा आणि वैद्यकीय शिबिराचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top