अयोध्येत निमंत्रितांसाठी लाडूचा प्रसाद! काशीच्या हलवायाने तयार केलेले भोजन

अयोध्या – 22 जानेवारीचा अयोध्येतील महासोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत उद्यापासून निमंत्रितांचे आगमन सुरू होईल. त्यांच्यासाठी काशीहून आलेल्या हलवायाने तयार केलेले भोजन आणि प्रसादाच्या लाडूची पाकिटे तयार होत आहेत.
अयोध्येत प्राणप्रतिष्ठेआधी गर्भगृह 21 कलशजलाने शुद्ध केले जाणार आहे. आज अनुष्ठानाचा पाचवा दिवस होता. आज पुष्प, फल, शर्कराधिवास, नदी जल स्नान, पूजा, आरती हे पूजाविधी पार पडले. दुसरीकडे 1008 हवन कुंडांमध्ये अयोध्येत अव्याहत यज्ञ सुरू आहे. 1008 पुरोहित आणि पाच हजारांहून अधिक यजमान प्राणप्रतिष्ठेअगोदर हवन-पूजन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या सोहळ्यापूर्वी यम-नियमांचे काटेकोर पालन करत आहेत. त्यांच्यासह श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा प्राणप्रतिष्ठा विधीचे यजमान आहेत.
या सोहळ्यानिमित्त अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) राम जन्मभूमी मंदिरात छावणीच उभारली आहे. ज्या लोकांना प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत यायचे आहे, त्यांनी 23 जानेवारीनंतरच यावे, असे आवाहन अयोध्या क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार
यांनी केले आहे. या कार्यक्रमाला भव्य बनवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशला आपली आतिथ्य संस्कृती दाखवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, असे योगी म्हणाले आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जे निमंत्रित येतील त्यांना देण्यासाठी लाडूच्या प्रसादाचे पॅकेट तयार झाले आहेत. हा प्रसाद ज्या बॉक्समध्ये देण्यात येणार आहे, त्यावर राम मंदिराचे छायाचित्र आहे. रामासाठी लोक जात, धर्म, भाषेपलिकडे जाऊन देशभरातून प्रसाद पाठवत आहेत, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे यजमान अनिल मिश्रा यांनी सांगितले.
श्रीराम मंदिराच्या भव्य मंडपात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्‍या देश-विदेशातील पाहुण्यांची खाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना मेथीचे थेपले, मटर कचोरी, पुरी आणि गाजर-मटर-फरसबीची मिश्र भाजी, लोणचे आणि बदाम बर्फी हे पदार्थ असलेले पॅकेट दुपारच्या जेवणासाठी देण्यात येणार आहे. काशीहून आलेले हलवाई हे सर्व पदार्थ तयार करणार आहेत. श्रीराम जन्मभूमी पथावर सुमारे पाच फूट उंच विविध गंधांच्या अगरबत्त्या लावण्यात आलेल्या आहेत. आयटीसीने या अगरबत्ती लावल्या आहेत. या अगरबत्ती 11 तास दरवळत राहतात. त्यामुळे अयोध्येचा कानाकोपरा भक्तीरसाने दरवळून गेला आहे. या कॉरिडोरला आयटीसीने सुगंध कॉरिडोर असे नाव दिले आहे.
दरम्यान, श्रीराम मूर्तीची छायाचित्रे काल व्हायरल झाली होती, त्यावर राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभू श्रीरामाचे नेत्र या छायाचित्रात खुले होते. प्रत्यक्षात गर्भगृहात स्थापन केलेल्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ही नेत्रपट्टिका प्राणप्रतिष्ठेदिवशीच उघडण्यात येणार आहे.
हा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेआधी छायाचित्रे कोणी व्हायरल केली त्याची चौकशी होईल, असे सत्येंद्र दास आज
माध्यमांना म्हणाले.
उद्धव ठाकरेंना अखेर निमंत्रण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अखेर मिळाले. शिवसेना भवनात स्पीड पोस्टच्या सहाय्याने ही निमंत्रण पत्रिका पोहोचली. मात्र ठाकरे हे अयोध्येला जाणार नाहीत. त्यांनी यापूर्वीच ही घोषणा केली आहे. सोमवारी ते नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.

फडणवीस अयोध्येला
जाणार नाहीत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उद्या रवाना होणार आहेत. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे. ते नागपूरमध्ये रामनगरमधील राम मंदिरात उपस्थित राहणार आहेत आणि या मंदिरातूनच प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहतील, असे सांगितले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top