अरबी समुद्रात उंच लाटा उसळणार! भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मुंबई

अरबी समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने (आयएनसीओआयएस) वर्तवली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळी ११.३० पासून ते उद्या रात्री ११.३० पर्यंत अशा ३६ तासांच्या कालावधीत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, समुद्र किनार्यावर आसपासच्या परिसरात तसेच सखल भागांमध्ये या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. साधारणपणे समुद्रात भरतीच्या कालावधीत लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे तसेच संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहनही केले आहे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे अधिक खबरदारी म्हणून महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनाही किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिकेसह मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top