अलिबागमधील कान्होजी आंग्रेसमाधी स्थळाचे सुशोभिकरण रखडले

अलिबाग –

अलिबागमधील कान्होजी आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम ठप्प झाले आहे. पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम थांबविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर कान्होजी आंग्रे समाधीस्थळ परिसर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत २१ जानेवारी रोजी सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रक्लपांतर्गत आंग्रे समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेश द्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, संरक्षक भिंतीवर कोरीव काम करून, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, एफआरपी मटेरियलच्या दिपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे, उद्यानात रोषणाई करणे ही कामे केली जाणार आहेत. संरक्षक भिंत आणि आरमारी नौकेची प्रतिकृती उभारणीचे काम हाती देखील घेण्यात आले होते. मात्र पुरातत्व विभागाने काही कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे कान्होजी आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top