आंबेडकरी चळवळीतील नेते गंगाधर गाडे यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर :

आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, नामांतर प्रणेते, माजी परिवहन राज्यमंत्री तथा पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले. गंगाधर गाडे गत ५ वर्षांपासून अल्झायमरने ग्रासले होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे.

गाडे यांचे पार्थिव उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गंगाधर गाडे राज्य सरकारमध्ये माजी परिवहन राज्यमंत्री होते. त्याचबरोबर पँथर चळवळीत लोकप्रिय बौद्ध नेते होते. त्यांनी ७ जुलै १९७७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वात आधी मागणी केली होती. पुढे १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले. या विद्यापीठाचा नामविस्तार हा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा करण्यात आला. गाडे यांनी अखेरपर्यंत आंबेडकरी विचारांची कास सोडली नव्हती. माजी मंत्री गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. ते वकील होते. १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. गाडे हे एक प्रभावशाली दलित नेते होते. त्यांनी दलित हक्कांसाठी अनेक लढे दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top