आता पालिकेची सर्व रुग्णालये सकाळी ८ वाजता सुरू होणार

  • डॉक्टरांना बायोमेट्रिक
    हजेरी बंधनकारक !

मुंबई- आता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ऐवजी ८ वाजता सुरू होणार आहेत.तसेच या रुग्णालयांच्या सर्व डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.तशी हजेरी न लावल्यास संबंधितांचा पगार कापण्यात येईल,असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिला आहे.त्यासंबंधी परिपत्रकच जारी करण्यात आले आहे.

सध्या पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये सकाळी येणार्‍या रूग्णांना
ओपीडी सुरू होण्यासाठी आणि डॉक्टर येण्याच्या प्रतिक्षेत ताटकळत राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.त्यामुळेच अशी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी ८ वाजताच ओपीडी सुरू करणे आणि संबंधित डॉक्टरांना दररोज बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.ही बायोमेट्रिक हजेरी डॉक्टरांच्या पगाराची जोडण्यात येणार आहे.
त्यामुळे एखाद्या डॉक्टरने बायोमेट्रिक हजेरी लावली नसल्यास संबंधित डॉक्टरचा पगार कापला जाईल,असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नॅशनल मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार प्रत्येकाला हजेरी लावणे गरजेचे असून अतिरिक्त आयुक्तांच्या बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयाचे अनेक डॉक्टरांनी स्वागत केले आहे. दरम्यान,पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी पदभार स्विकारल्यापासून रात्री अपरात्री रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट द्यायला सुरुवात केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top