आता ‘ वंदे भारत’ एक्स्प्रेस१४ मिनिटांत स्वच्छ होणार

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे आता वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची जलद साफसफाई करण्यासाठी १४ मिनिटांची चमत्कार संकल्पना राबविणार आहे. यामध्ये ‘वंदे भारत’ अवघ्या १४ मिनिटांत स्वच्छ केली जाणार आहे. या संकल्पनेचे औपचारिक उद्घाटन आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दिल्लीतील कॅन्ट स्थानकात झाले. देशभरातील २९ रेल्वे स्थानकांवर ‘वंदे भारत ‘साठी ही आगळीवेगळी संकल्पना राबविली जाणार आहे.
रेल्वे वैष्णव यांनी काल दिल्लीत या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, जपानमधील ओसाका, टोकियो या स्थानकांवर रेल्वेगाड्या अवघ्या ७ मिनिटांत चकाचक केल्या जातात. त्याच धर्तीवर आपल्या देशात १ ऑक्टोबर पासून १४ मिनिटांत ‘वंदे भारत’ स्वच्छ केली जाणार आहे. सुरुवातीला फक्त ‘वंदे भारत’ गाड्याच या संकल्पनेत सहभागी असतील. हळूहळू देशातील सर्व रेल्वे गाड्या अशा पद्धतीने स्वच्छ केल्या जातील.
मुंबई, नागपूर आणि शिर्डीसह वाराणसी, म्हैसूर, गांधीनगर आदी स्थानकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. रेल्वेच्या एका डब्यात चार कर्मचारी याप्रमाणे आठ डब्यांच्या गाडीमध्ये ३२ कर्मचारी अत्याधुनिक यंत्राद्वारे स्वच्छता करण्यात येईल. भारतीय रेल्वेतील ही पहिलीच अनोखी संकल्पना राबविली जात आहे. ही संकल्पना सुरू करण्याआधी रेल्वेने दोन चाचण्या घेतल्या होत्या. त्यावेळी रेल्वे कर्मचार्‍यांनी सुमारे २८ मिनिटांत ट्रेन स्वच्छ केली आणि नंतरच्या प्रयत्नात त्यांना एका गाडीसाठी १८ मिनिटे लागली होती, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top