आमदारांना भाजपची फूस होती? सुनील प्रभूंची विटनेस बॉक्समध्ये तपासणी

मुंबई -आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून नियमित सुनावणीला सुरुवात झाली. शिंदे गटाच्या आमदारांना भाजपची फूस होती, याचा तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावे नाहीत तर आरोप का केला? 2019 च्या निवडणुकीत कोणाचे फोटो वापरले? पंतप्रधान, फडणवीस यांचे फोटो वापरले का? उठाव झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? असे अनेक प्रश्न विचारत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या सभागृहात प्रभूंच्या साक्षीसाठी खास विटनेस बॉक्स आणण्यात आला होता. सुनावणी उद्याही सुरू असणार असून, प्रभूंची साक्ष नोंदवली जाईल.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत शिंदे गटाच्या वतीने आज ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी तर ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाने आज कागदपत्रे सादर केली. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी 21 जून 2022 ला मनोज चौघुले यांनी शिंदेंचे पीए प्रभाकर काळे यांना पाठवलेल्या व्हॉट्सॲपचा मेसेज रेकॉर्डवर घेतला. तसेच मुंबईत शिवसेना विभाग प्रमुखांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र आणि 2 जुलै 2022 रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या व्हिपची कॉपीही रेकॉर्डवर घेतली. मात्र शिंदे गटाने कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला. त्यांना 24 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला. प्रतिज्ञापत्राला अर्थ नाही, फेरसाक्ष प्रत्यक्षात नोंदवावी, अशी मागणी शिंदे गटाने केली. याला ठाकरे गटाचा विरोध होता. यावरून पहिल्या सत्रात दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. सुनावणीचे पहिले सत्र दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होते. मध्यंतराच्या काळात विधानसभा सभागृहात विटनेस बॉक्स आणण्यात आला आणि आतापर्यंत वकिलांच्या शेजारी बसणारे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू साक्षीसाठी विटनेस बॉक्समध्ये आले. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे वाचन केले. नंतर उलटतपासणीदरम्यान, शिंदे गटाच्या वतीने वकील महेश जेठमलानी यांनी प्रभूंवर प्रश्नांचा भडिमार केला. 2019 ची निवडणूक तुम्ही भाजपच्या युतीत लढवली होती का, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे वापरली होती का, असे प्रश्न विचारून शिंदे गटाच्या वकिलांनी विचारधारेच्या मुद्यावर सुनील प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर प्रभूंनी म्हटले की, मला शिवसेना पक्षाने एबी फॉर्म दिला होता. त्याआधारे मी शिवसेना पक्षचिन्हावर निवडणूक लढवली. पण जेठमलानींनी यावर प्रतिप्रश्न केला की, तुम्ही निवडणूक लढवताना विरोधात असणाऱ्या काँग्रेस तसेच इतर पक्षांवर आरोप-प्रत्यारोप केले होते का? त्यावर मी विकासाची कामे केली होती, त्याआधारे जनतेकडे मते मागितली. कोणावर टीका करण्याची वेळ माझ्यावर आली नाही, असे प्रभू म्हणाले. प्रचाराच्या पोस्टरवर काय छापले मला आठवत नाही. युती होती. माझ्या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो मात्र नक्की होते, असे सुनील प्रभूंनी सांगितले. शपथपत्रात गुवाहाटी किंवा भाजपच्या सहभागाचा उल्लेख नाही. आमदारांना भाजपची फूस होती, याचा तुमच्याकडे पुरावा आहे का, यावर प्रभू म्हणाले, जे काही आहे ते रेकॉर्डवर सांगितलेले आहे. यावर जेठमलानींनी विचारले की, पुरावे नाहीत तर आरोप का केला? बंड झाले तेव्हा तुम्ही कुठे होता, एकनाथ शिंदे संपर्कात नव्हते तेव्हा तुम्ही काय करत होता, अशी प्रश्नांची सरबत्ती जेठमलानींनी केली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
याचिकेच्या इंग्रजीतील मसुद्यावरूनही शिंदे गटाने सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला इंग्रजी वाचता येते का, समजते का, असे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रभूंना विचारले. प्रभूंनी उत्तर दिले की, मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते. मात्र मला माझ्या भाषेत अधिक चांगले समजते. त्यावर अपात्रता याचिका सही करण्याच्या आधी तुमच्या वकिलाने इंग्रजीत वाचून दाखवली होती का, असा सवाल जेठमलानींनी केला. त्यावर असीम सरोदेंनी आपल्याला याचिकेतील मुद्दे मराठीत समजावले अशी माहिती प्रभूंनी दिली. मात्र शपथपत्रात असे इंग्रजीतले मराठीतून समजावल्याचा उल्लेख नसल्याचा तांत्रिक मुद्दा जेठमलानींनी काढला. त्यावर असे प्रश्न विचारू नयेत म्हणत ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. नंतर सुनील प्रभूंची संपूर्ण साक्ष आणि उलटतपासणी मराठीतच लिहून घेण्यात आली. पण सुनावणी संपल्यानंतर याबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले की प्रभू जे मराठीत सांगत होते ते तसेच्या तसे इंग्रजीत जात नव्हते, असा आरोप करत आमचे वकील देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतला आणि योग्य भाषांतरकाराद्वारे ही साक्ष पुढे जावी, अशी मागणी केली.
व्हिडिओग्राफीची मागणी
शिवसेनेतील फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले जात आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. एकनाथ शिंदे यांनी पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत ते बंद दारामागे होऊ नये. अध्यक्षांनी त्यावर काय निर्णय दिला ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावे. हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. शिंदे गटाच्या वकिलांनी व्हिडिओग्राफीला आक्षेप घेतला. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top