आमदार सुनील केदार दोषी 5 वर्षे कैदेची शिक्षा

नागपूर – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना आज न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली. त्यांना साडेबारा लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. खासगी कंपन्यांशी संगनमत करून त्यांना फायदा करून देत शेतकर्‍यांनी बँकेत ठेवलेले पैसे बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने तब्बल 18 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह सहाजण दोषी ठरले, तर इतर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सर्व आरोपींना पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सहकारी बँकेचे पैसे खासगी कंपनीत गुंतवून बुडवले असा केदार यांच्यावर आरोप होता. न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे केदार यांच्याबरोबर काँग्रेस पक्षालाही मोठा झटका बसला आहे.
सुनील केदार, अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी अशी या प्रकरणातील 6 दोषींची नावे आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता, तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत रोखे दलाल केतन शेठ, बँक मॅनेजरअशोक चौधरी हे या खटल्यातील मुख्य आरोपी आहेत. सहकार विभागाचा कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम खाजगी कंपन्यांत गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे बँकेत ठेवलेले शेतकर्‍यांचे पैसेही बुडाले होते.
2001-02 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही.ते बँकेच्या नावावर झालेच नाहीत. पुढे रोखे खरेदी करणार्‍या या खासगी कंपन्या दिवाळखोरीत गेल्या होत्या. या कंपन्यांनी बँकेला सरकारी रोखे दिले नाहीतच, शिवाय बँकेची रक्कमही परत केली नाही.या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर 403, 403 आणि 126 या कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. त्याचा आज निकाल आज लागला.

होम ट्रेडचा संबंध
या घोटाळ्यामागे शेअर दलालांची एक मोठी टोळी होती. त्यातलाच एक होता घोटाळेबाज संजय अग्रवाल. त्याच्या होम ट्रेड या कंपनीचेही नाव त्यावेळी खूप गाजले होते. कारण सचिन तेंडुलकर, हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी या कंपनीची जाहिरात करत होते. ही कंपनी निव्वळ एक पोर्टल म्हणजे वेबसाईट म्हणून सुरू झाली होती. याच अग्रवालशी प्रत्यक्षात ती कुठलेही उत्पादन करत नव्हती. याच अग्रवालशी हात मिळवणी केल्याचासुनील केदार यांच्यावर आरोप आहे
अग्रवाल यांनी जवळपास 20 बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी पैसे घेतले आणि नंतर ते रोखे इतर बँकांना विकले. बँकांना रोख्यांच्या प्रमाणपत्रांच्या फक्त छायाप्रती देण्यात आल्या. बँकांना कधीच संशय आला नाही. सप्टेंबर 2001 मध्ये अग्रवाल यांनी पुण्यातील सदगुरु जंगली महाराज सहकारी बँकेसाठी 55 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करून या बँकेलाही प्रमाणपत्रांची छायाप्रत दिल्याचे नंतर तपासात उघड झाले होते. या रोख्यांची नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कथित पुनर्विक्री करण्यात आली होती. होम ट्रेडने अनेक कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची खरेदी केली असली तरी बँकांना फक्त काही अंश वितरित केले.अग्रवाल यांनी सरकारी रोखे विकत घेतले, परंतु बँकांकडून कर्ज घेण्यासाठी त्यांचा वापर तारण म्हणून केला,असेही म्हटले जाते. त्याने कधीही सरकारी रोखे खरेदी केले नाहीत आणि त्याऐवजी बनावट नोट दिल्या. रोख्यांसाठी घेतलेले पैसे इतरत्र वापरून सहकारी बँकांना फक्त परताव्याचा दर सांगून खूश ठेवले, असेही सांगितले जाते. या घोटाळ्यामुळे दलाल-बँकर-राजकारणी यांचे संबंध उघडकीस आले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या या घोटाळ्याबद्दल म्हणतात, हे फक्त हिमनगाचे टोक आहे. हा घोटाळा कुठे संपेल हे कोणालाच माहीत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top