इंडियन ऑईल कंपनीविरोधात धुतुमच्या भूमिपुत्रांचे उपोषण सुरूच

उरण – तालुक्यातील धुतुममधील भूमिपुत्रांना इंडियन ऑईल कंपनीत रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. दरम्यान,दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे.
कंपनी प्रशासन जोपर्यंत मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर यांनी केला आहे. इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांच्या भरती सुरू आहे.
त्याविरोधात स्थानिक भुमिपूत्र संतप्त झाले आहेत. धुतुममधील भुमिपुत्रांनी सोमवारपासून धुतुम ग्रामपंचायतीच्या सुचिता ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू केले आहे. यात त्या स्वतःही उपोषण करीत आहेत.
या गावाच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग हा तेल व रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प आहे. २५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. मात्र प्रकल्पात अद्यापही केवळ २७ प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग प्रकल्प खाजगीकरण करून अदानी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top