‘इंडिया’चे टेन्शन वाढले! मोदींचा करिष्मा अढळ

नवी दिल्ली- आज राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांचा निकाल जाहीर झाला. तेलंगणा सोडून इतर तिन्ही राज्यांत भाजपाची बहुमताने सत्ता आली आणि नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे हे स्पष्ट झाले. यामुळेच ‘इंडिया’ आघाडीचे टेन्शन वाढले आहे. उत्तरेत मोदींची लाट कायम असून दक्षिण राज्यातच मोदींना रोखले जाऊ शकते. मात्र येत्या काळात दक्षिणेतही भाजपाने काही जादू केली तर भारतभर भाजपच राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे. मोदींना हरविण्याचे स्वप्न बघणाऱ्या ‘इंडिया’ला यानंतर मोदींच्या खासदारांची संख्या वाढू नये यासाठीच कष्ट घेण्याची वेळ आली आहे.
राजस्थानमध्ये दर विधानसभा निवडणुकीत विद्यमान सरकार पराभूत होते त्याप्रमाणेच यावेळीही घडले आणि काँग्रेसच्या गेहलोत सरकारचा पराभव करून भाजपने बाजी मारली. मात्र यावेळी काँग्रेसने प्रचार करताना राजस्थानमध्ये सत्ता तर राखणारच पण 156 जागा जिंकणार अशी फुशारकी मारली होती. काँग्रेस या आकड्याच्या आसपासही पोहोचू शकली नाही. मध्यप्रदेशात शिवराजसिंग चौहान यांच्या भाजप सरकारच्या विरोधात जनमत होते. अशाही स्थितीत ‘एमपी के मन मे मोदी, मोदी के मन मे एमपी’ असा प्रचार करत मोदींनी करिष्मा दाखवून शिवराजसिंग चौहान यांना सलग पाचव्यांदा विजयी केले. छत्तीसगडमध्ये आमचेच सरकार येणार याचा काँग्रेसला अतिविश्वास होता. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यावर जनता खूष असल्याचे काँग्रेसचे मत होते. मात्र तेथे ‘मोदींचा विश्वास’ आणि महादेव ॲप घोटाळ्याचा वार करून मोदींनी हे राज्यही खिशात टाकले. तेलंगणात केसीआर सरकार खाली खेचून काँग्रेसने विजय मिळविला. येथेही भाजपाचे आमदार यावेळेस वाढले असून पुढील निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली तर काय होईल, हे सांगता येणार नाही.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण, मोदींना विरोध करण्यासाठी अनेक पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ‘इंडिया आघाडी’, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळेल असे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेसकडून आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांकडून तशी वक्तव्येही होत होती. मात्र प्रत्यक्षात नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचार आणि अमित शहा यांचे नियोजन यावेळेसही भारी पडले. काँग्रेसला पुन्हा अपयशाला तोंड देण्याची वेळ आली आहे. आजचे निकाल जाहीर होईपर्यंतच ‘इंडिया आघाडी’त कुरबूर सुरू झाली. या आघाडीचे नेतृत्व न मिळाल्यामुळे आधीच नाराज असलेले नितीशकुमार यापासून काहीसे दूर गेलेले आहेत. त्यातच आताच्या पराभवानंतर काँग्रेसवर आघाडीतील काही नेत्यांनी टीका सुरू केली. पाच राज्यांच्या निवडणुका असूनही काँग्रेसने आघाडीतील एकाही पक्षाला सन्मान दिला नाही. एकाही नेत्याला प्रचारासाठी आमंत्रित केले नाही. नितीशकुमार, शरद पवार, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव या आणि अशा अनेक नेत्यांचे स्वतःचे मतदार आहेत. असे असूनही आपणच जिंकणार आणि त्याचे श्रेय फक्त आपल्यालाच मिळाले पाहिजे या मानसिकतेतून काँग्रेसने एकाही नेत्याला प्रचारासाठी बोलाविले नाही, अशी टीका होऊ लागली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पराभव मान्य केला. पण हा पराभव नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे झाला हे मान्य न करता भाजपने वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांमुळे हा पराभव झाला असे म्हटले. महाराष्ट्रात भाजपसह सत्तेत गेलेला शिंदे गट आणि अजित पवार गट हे तर भाजपच्या यशामुळे उल्हासित झाले होते. लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदीच पूर्ण ताकदीने निवडून येणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी हसत हसत सांगितले. आता विरोधक पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा काढणार का? असा टोलाही दोघांनी लगावला.
निवडणूक निकालांनंतर देशभरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप मुख्यालयात सायंकाळी उशिरा विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top