इंदिराजींचे सुरक्षा प्रभारी मिझोरामचे मुख्यमंत्री बनणार

एझवाल – मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निकालात एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेले अंदाज खरे करत झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) या पक्षाने राज्यात सत्ता मिळवली आहे. लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखाली झेडपीएम पक्षाने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्व 40 जागा लढवलेल्या काँग्रेसला तर अवघ्या एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजपला दोन जागा जिंकता आल्या आहेत. एकेकाळी पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुरक्षा प्रभारी असलेले झेडपीएमचे पक्षप्रमुख लालदुहोमा हे आता मिझोरामचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.
मिझोराममध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा असून, बहुमताचा आकडा 21 इतका आहे. 2018 च्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने 26 जागा जिंकल्या होत्या. झेडपीएमला 8, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या वाट्याला एक जागा आली होती. या निवडणुकीत एनएनएफला धक्का देत झेडपीएमने निर्णायक आघाडी घेतली आहे. एमएनएफला फक्त 10 जागांवर विजय मिळवता आला. झेडपीएम या पक्षाची स्थापना पाच वर्षांपूर्वी झाली. लालदुहोमा यांनी झोरम नॅशनलिस्टिक पार्टी नावाने स्वतःचा पक्ष सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी पाच लहान पक्षांना एकत्र घेत झेडपीएम नावाने युती केली.
मुख्यमंत्री झोरमथांगा हे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. झेडपीएमच्या लालथंनसांगा यांनी यांचा पराभव केला. मिझोरामचे आरोग्य मंत्री लालथंगलियाना यांना दक्षिण तुईपुई या विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. झेडपीएमचे जेजे लालपेखलुआ यांनी त्यांचा 135 मतांनी पराभव केला.
झेडपीएमचे लालदुहोमा म्हणाले की, मी उद्या किंवा परवा राज्यपालांना भेटेन. या महिन्यात नव्या सरकारचा शपथविधी होईल. मिझोराम आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हाच वारसा आपल्याला जुन्या सरकारकडून मिळणार आहे. मात्र, आम्ही वचनबद्धता पूर्ण करणार आहोत.
इंदिराजींचे सुरक्षा प्रभारी ते मुख्यमंत्री प्रवास
आयपीएस अधिकारी असलेले लालदुहोमा यांचा राजकारणातील प्रवास विलक्षण आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. गोवा केडरच्या भारतातील पोलीस सेवेतील अधिकारी असलेले लालदुहोमा नंतर केंद्रिय प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यापुढे राष्ट्रीय राजधानीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेचे ते प्रभारी बनले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ZPM ची स्थापना केली. 1984 मध्ये लोकसभेत त्यांनी प्रवेश केला. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेले संसदेचे ते पहिले सदस्य बनले तेव्हा त्यांना महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागला.
2020 मध्ये लालदुहोमा यांना पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्रता ठरवले गेले. पण 2021 मध्ये सेरछिप जागेसाठी पोटनिवडणूक जिंकून त्यांनी दमदार पुनरागमन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top