‘इसिस’च्या दहशतवाद्याला दहा वर्षांचा तुरुंगवास

बंगळूरू : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या संस्थेचा ट्विटर अकाऊंट हाताळणारा मेहदी मसरूर बिस्वास याला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इसिस ही बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना सीरियामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे.
मेहदी हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. २०१२ मध्ये त्याने इसिसच्या वतीने ‘शम्मीविटनेस ट्विटर’ हे खाते उघडले होते. इसिसने घडविलेल्या घातपाती कारवायांची माहिती ट्विट करून तो तरुणांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता.

पोलिसांनी १३ डिसेंबर २०१४ रोजी जलाहळ्ळी सिद्धार्थनगर येथे मेहदीला अटक केली होती. याप्रकरणी गंगामनागुडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मेहदीकडून लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली होती. ट्विटरकडून कागदपत्रे गोळा करून ३७ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने आरोपी मेहदीला दहा वर्षांचा तुरुंगवास आणि २ लाख १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top