इस्रायलच्या हल्ल्यात रॉयटर्सच्या पत्रकाराचा मृत्यू !६ पत्रकार जखमी

बेरूत

दक्षिण लेबनॉनमध्ये शुक्रवारी इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या इस्सम अब्दुल्लाह या पत्रकाराचा मृत्यू झाला. रॉयटर्सचे अन्य दोन पत्रकार थायर अल-सुदानी आणि महेर नाझेह यांसह इतर सहा पत्रकारही जखमी झाले आहेत.त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेला इस्रायल जबाबदार असल्याचे लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती आणि हिजबुल्लाहने म्हटले आहे. फ्रान्स-प्रेस वृत्तसंस्था आणि अल जझीरा वृत्तसंस्थेचे पत्रकारही या घटनेत जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांनीही या घटनेला इस्रायल जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलार्ड एर्डन यांनी म्हटले आहे की, ‘कोणत्याही पत्रकाराला लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नाही. पण युध्दाच्या वेळी अशा घटना घडू शकतात.’ इस्रायल सीमेवर हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात युध्द सुरु आहे. अल जझीरा, फ्रान्स-प्रेस वृत्तसंस्था आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थांच्या पत्रकारांचा एक गट इस्रायल सीमेला लागून असलेल्या लेबनॉनच्या दक्षिण भागात वार्तांकन करत होता.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘वृत्तसंस्थेसाठी क्षेपणास्त्राचे चित्रीकरण करत असताना इस्सम अब्दुल्लाह याचा मृत्यू झाला. ते एका उंच दगडावर बसले होते. यावेळी त्याचा कॅमेरा टेकड्यांच्या दिशेने होता. एका मोठ्या स्फोटाच्या धक्क्याने त्याचा कॅमेरा हादरला. काही सेकंदांनंतर दुसरे एक क्षेपणास्त्र पत्रकारांच्या गाडीवर धडकले. यामुळे त्यांच्या गाडीने पेट घेतला. इस्सम अब्दुल्लाह याच्या मृत्यूने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. या घटनेची आम्ही चौकशी सुरु केली आहे. इस्समच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना आम्ही आधार देत आहोत.’

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अल्मा अल-शाब हे गाव चकमकीचे ठिकाण बनले आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल्लाह यांची आई फातिमा कान्सो यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी इस्रायल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने माझ्या मुलाची जाणीवपूर्वक हत्या केली. त्याने ‘प्रेस’ हा शब्द दिसत असलेले जॅकेट घातले होते. इस्रायल हा गुन्हा नाकारू शकत नाही’, असेही त्याच्या आईने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top