इस्रायलमधून भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली

ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. यामध्ये दोन चिमुकल्यांसह २३५ भारतीयांचा समावेश आहे. या नागरिकांना घेऊन येणारे विमान शनिवारी सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी या सर्व भारतीयांचे विमानतळावर स्वागत केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत, ‘२३५ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे दुसरे विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून निघाले’, असे सांगितले.

ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायल-हमास युद्धात अडकलेल्या तब्बल ४४७ भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात आले आहे. परत आलेल्या सर्व भारतीयांनी ‘ऑपरेशन अजय’ या उपक्रमाबद्दल भारत सरकारचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युध्दाचे पडसाद जगभर उमटत आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या १८,००० भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. इस्रायलमधील भारतीयांची नोंदणी गुरुवारी सुरू झाली. तर शुक्रवारी भारतीय प्रवाशांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरले.या पहिल्या तुकडीत २१२ भारतीय सुखरुप मायदेशी परतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top