इस्रायली दूतावासाजवळ स्फोट! पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली – नवी दिल्लीतल्या चाणक्यपूरी भागातील इस्त्रायली दुतावासाजवळ काल झालेल्या सौम्य स्फोटाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. स्फोट होताच दिल्ली पोलीस तत्काळ या ठिकाणी पोहोचले . पोलिसांना या ठिकाणाहून इस्त्रायली ध्वजात गुंडाळलेले एक पत्र सापडले आहे. या पत्रात इस्त्रायलच्या गाझावरच्या हल्ल्याचा बदला असे लिहिले आहे. इस्त्रायली दूतावासाचे प्रवक्ते गाय निर यांनी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता स्फोटासारखा मोठा आवाज आल्याचे म्हटले आहे. हा निश्चितच स्फोट असून दिल्ली पोलिस त्याची तपासणी करत आहेत. दुतावासातल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना काहीही झाले नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला असून आमचे सुरक्षा कर्मचारी पोलिसांना सहकार्य करत असल्याचे दुतावास प्रमुख ओहाद नकाश कायनार यांनी सांगितले आहे. दिल्ली पोलिसांना या वेळी सीसीटीव्ही फुटेज मधून दोन संशयितांचे चेहरे दिसले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या संदर्भात त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून दूतावास आणि इतर इस्रायली ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फॉरेंसिक विभागानेही इथले नमुने गोळा केले आहेत. दरम्यान इस्त्रायली दूतावासाने भारतातील इस्त्रायली नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. इस्रायली नागरिकांनी हॉटेल, पब, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना इस्रायली असल्याच्या खुणा ठळकपणे प्रदर्शित करू नयेत. त्याचप्रमाणे त्यांनी आपले पर्यटन कार्यक्रम आणि नुकतेच काढलेले फोटो समाजमाध्यमांवर टाकू नयेत, असेही सुरक्षा सल्ल्यात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top