इस्रायल पंतप्रधानाच्या भ्रष्टाचार खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू

जेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणी लागू केल्याने स्थगित करण्यात आला होता.मात्र आता इस्रायलचे न्यायमंत्री यारिस लेव्हिन यांनी १ डिसेंबरपासून ही आणीबाणी उठवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचार खटल्याची सुनावणी काल सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या भ्रष्टाचाराचा खटला जानेवारी २०२० मध्ये प्रथम सुरू झाला.त्यावेळी फसवणूक,विश्वासभंग आणि लाचखोरीच्या आरोपांखाली न्यायालयात प्रतिवादी म्हणून हजर होणारे ते पहिले विद्यमान इस्रायली पंतप्रधान ठरले होते.त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यातील एका खटल्यात त्यांच्यावर परदेशातील व्यावसायिकांकडून सिगार आणि शॅम्पेन सारख्या भेटवस्तू मिळाल्याच्या आरोपासंदर्भात फसवणूक आणि विश्वासभंग केल्याचा आरोप आहे. तर दुसर्या प्रकरणात बेझेक टेलिकम्युनिकेशन या कंपनीच्या वेबसाईटवर नेतान्याहू यांनी त्यांना अनुकूल बातम्या प्रसारित करण्याच्या बदल्यात या वेबसाइटच्या फायद्यासाठी काही निर्णय घेतल्याचा आरोप आहे. जेरूसलेमच्या जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी होती. २० सप्टेंबरला शेवटची सुनावणी झाली आणि ७ ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यानंतर या सुनावलीला स्थगिती मिळाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top