ईडीने हेमंत सोरेन यांची 10 दिवसांची कोठडी मागितली

रांची – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित भूखंड घोटाळ्यात ईडीने बुधवारी अटक केल्यानंतर आज त्यांना पाटणाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले. ईडीने सोरेन यांना दहा दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने ईडीच्या याचिकेवरील सुनावणी राखून ठेवली. न्यायालय उद्या गुरुवारी आपला निर्णय सुनावणार आहे. तोपर्यंत सोरेन यांची एक दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे सोरेन यांना आजची रात्र होटवार तुरुंगात काढावी लागणार आहे.
सोरेन यांना अटक केल्यापासून झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या पार्श्‍वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात ईडीचे पथक दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून न्यायालयाच्या दिशेने निघाले. वाटेत ठिकठिकाणी झामुमोच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ईडीच्या विरोधात निदर्शने केली. अनेक ठिकाणी आगी लावण्याच्या घटनाही घडल्या.
रांचीमध्ये एकीकडे हेमंत सोरेन यांची न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झामुमो आघाडीचे सरकार नव्याने स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू होत्या. चंपाई यांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. आपल्याला 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत त्यांनी 43 आमदारांच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र राज्यपालांना सुपूर्द केले. त्यांचा एक व्हिडिओही चंपाई यांनी राज्यपालांना दाखवला. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना अन्य राज्यांमध्ये अज्ञात स्थळी नेऊन ठेवले जाईल,अशीही चर्चा होती. दुसरीकडे भाजपानेही आपल्या विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अर्धा तासाच्या भेटीनंतर कल्पना सोरेन ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्या. मात्र मीडियाशी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्या तडक आपल्या निवासस्थानी निघून गेल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top