ईडी अटक करून कोठडीत डांबू शकत नाही! आम्ही लक्ष घालू! सुप्रीम कोर्टाने बजावले

नवी दिल्ली- संशयाने एखाद्याला अटक करून महिनोंमहिने तुरुंगात डांबून ठेवण्याच्या अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कार्य पध्दतीवर सर्वोच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास सुरू आहे या सबबीखाली आरोपीला तुम्ही वाट्टेल तेवढे दिवस तुरुंगात ठेवू शकत नाही. आम्ही हे निमूटपणे सहन करत राहणार नाही. काही प्रकरणांत आम्हाला स्वतः दखल घ्यावी लागेल, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती प्रेम प्रकाश या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने ईडीच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले.
कोर्ट म्हणाले की, जामीन मिळविणे हा प्रत्येक आरोपीचा कायदेशीर अधिकार आहे. तपास सुरू आहे या सबबीवर तुम्ही आरोपीच्या जामीन अर्जाला वाट्टेल तेवढा कालावधी विरोध करत राहू शकत नाही. तुम्ही थोड्या थोडया दिवसांनी पुरवणी आरोपपत्र जोडून आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करत राहता. ही बाब गंभीर आहे. अशा काही प्रकरणांची आम्ही स्वतः दखल घेऊन त्यावर सुनावणी घेऊ.
भारतीय दंडविधान संहितेमधील तरतूदीनुसार गुन्हयाचा तपास विशिष्ट कालमर्यादेत पोलीस पूर्ण करू शकले नाहीत, आरोपपत्र दाखल करु शकले नाहीत तर अशा स्थितीत अटक आरोपी हा जामीन मिळविण्यास पात्र ठरतो. तपास पूर्ण करण्यासाठी साधारणतः 60 किंवा 90 दिवसांची कालमर्यादा असते.मात्र बऱ्याचशा प्रकरणात तपास यंत्रणा पुरवणी आरोपपत्र दाखल करीत आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करीत राहतात असे निरीक्षण न्या. दत्ता यांनी नोंदविले. न्या.दत्ता यांच्याप्रमाणे न्या. खन्ना यांनीही आपले हेच मत नोंदविले. जामिनाचा अधिकार हा घटनेतील अनुच्छेद 21 मध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे पालन करताना मनी लाँडरिंग
कायद्यातील (पीएमएलए) जामिनासंबंधीच्या जाचक अटी अडथळा ठरत नाहीत. प्रेम प्रकाश यांच्या बाबतीत कोठडीतील कालावधी अठरा महिन्यांचा आहे. त्यामुळे पीएमएलए कायद्यातील कलम 45 चा आधार घेत आरोपीचा जामिन मिळविण्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही.मनिष सिसोदिया प्रकरणात आम्ही याआधीच हे स्पष्ट केले आहे,असेही न्या. खन्ना म्हणाले. या प्रकरणी पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी घेण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले.तोपर्यंतच्या कालावधीत न्यायालयाने उपस्थित केलेल्या कायदेशीर बाबींवर इडीने भूमिका स्पष्ट करण्याचे
निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, प्रेम प्रकाश यांचा संबंध झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी जोडून ईडी त्या दिशेने तपास करीत आहे. त्यामुळे प्रकाश यांना जास्तीत जास्त दिवस कोठडीत ठेवण्याचा ईडीचा प्रयत्न अशी उघड चर्चा झारखंडमध्ये होत आहे. हेमंत सोरेन हे सध्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. झारखंडमधील खाण माफियांशी प्रकाश यांचा संबंध आहे असे ईडीचे म्हणणे आहे. खाण माफियांच्या अवैध व्यवहारांमधून मिळालेला अफाट पैसा प्रकाश वेगवेगळया ठिकाणी वळविला आहे,असा ईडीचा आरोप आहे. प्रेम प्रकाश यांचा जामीन अर्ज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.त्यामुळे प्रकाश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आठ महिने त्यांना कोठडीत ठेवल्यानंतरही ईडीने आरोपपत्र दाखल केलेले नाही अशी तक्रार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top