उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायलचे रणगाडे

*इस्रायल हमास युद्धाची व्याप्ती वाढणार
गाझा

इस्रायल हमास युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. आता इस्रायलचे रणगाडे उत्तर गाझाच्या सीमेवर येऊन पोचल्याने या युद्धाची व्याप्ती वाढणार आहे. आमच्या कारवाईमध्ये हमासचे शेकडो दहशतवादी ठार झाले, असा दावा इस्रायली लष्कराने केला. मागील २४ तासांमध्ये आम्ही सहाशेपेक्षाही अधिक लक्ष्यांचा वेध घेतल्याचेही लष्कराने यावेळी सांगितले,तर दुसरीकडे ‘आम्ही जोरदार हल्ला केल्याने इस्राईलच्या लष्कराला माघारी परतावे लागले, असे हमासनेही म्हटले.

उत्तर गाझामध्ये इस्रायलच्या लष्कराला हमासच्या तीव्र हल्ल्याचा सामना करावा लागला. गाझा शहराच्या किनारी भागामध्ये असलेल्या झायतून जिल्ह्यात इस्रायलचे रणगाडे घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारे रस्ते पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले असून या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर इस्रायलच्या लष्कराकडून बेछूट गोळीबार केला जात असल्याचा दावा एका स्थानिकाने केला. इस्रायलच्या या लष्करी कारवाईमुळे गाझात अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. मात्र, इस्रायलला साथ देणाऱ्या अमेरिकेने या संघर्षात स्वतःचे लष्कर उतरविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान जीवितहानी टाळण्यासाठी गाझातील नागरिकांनी दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करावे, असा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता, मात्र तरीही हजारो नागरिक सध्या याच भागात अडकले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top