उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदावरून प्रियंका गांधी यांना हटवले

लखनौ- लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हटवून त्यांच्याजागी काँग्रेस नेते अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अविनाश पांडे काँग्रेसचे प्रभारी असतील. त्याचबरोबर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना छत्तीसगड काँग्रेसच्या प्रभारीपदी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्त केले आहे.
राज्यातील प्रभार बदलांबाबत काँग्रेसने एक यादी जारी केली आहे. या यादीनुसार काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांना गुजरातचा प्रभार देण्यात आला आहे. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह यांच्याकडे आसाम सोबतच मध्य प्रदेशचा अतिरिक्त प्रभार सोपण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना कर्नाटकला पाठवण्यात आले आहे. या यादीनुसार प्रियंका गांधी यांना कोणताही पोर्टफोलियो देण्यात आलेला नाही. तेलंगणातील विजयानंतर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्यावरही गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या कुमारी शैलेजा यांना उत्तराखंड, काँग्रेस नेते जी.ए. मीर यांना झारखंड आणि पश्चिम बंगाल, काँग्रेस नेते दीपक बबरिया दिल्ली आणि हरियाणा,काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याकडे संचार, काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांना बिहार, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंडीगड, काँग्रेस नेते देवेंद्र यादव यांच्याकडे पंजाबचा प्रभार सोपवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top