उत्तर भारत थंडीने गारठला दिल्ली शिमलाहून थंड

नवी दिल्ली

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. आज दिल्लीत सर्वात जास्त थंडावा होता. येथे किमान तापमान ४.९ अंश सेल्सिअस, तर आज शिमलामध्ये किमान तापमान ६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. त्यामुळे आज दिल्लीत शिमलापेक्षा जास्त थंडी होती.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिस्सार हे सर्वात थंड ठिकाण होते. येथील किमान तापमान ४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. थंडीमुळे भारतातील बहुतांश भागात दृश्यमानता ही ५०० मीटरपेक्षा कमी होती. मध्य प्रदेश-राजस्थानच्या अनेक भागात किमान तापमान ७ अंशांपेक्षा कमी होते. आज लोधी रोड, आयानगरसह दिल्लीच्या अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. पंजाबमधील अमृतसरमध्येही धुके कायम आहे. येथील किमान तापमान ६ अंश सेल्सिअस होते. थंडीच्या लाटेमुळे अमृतसरमध्ये अनेक ठिकाणी शेकोटी पेटवण्यात आली. दरम्यान, दिल्लीत पुढील चार दिवस हलके धुके राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून देशाच्या काही भागांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top